आईचा ब्रेक


मिस्टर सानेंनी हळू डोळे उघडले. खिडकीतून उन्हं येत होती. खाडकन जागे झाले. दुपार झाली कि काय! घड्याळ बघितल, हुश्श, आठच वाजतायेत! पण पुढच्याच क्षणी लक्षात आलं, आठ वाजले तरी किचन मधून काही आवाज येत नाहीयेत. आज तर गुरुवार, वर्किंग डे, एव्हाना किचन मधून आवाजच नव्हे तर तर-तर्हेचे वासही यायला हवेत. डबा तयार झाला असला पाहिजे, चहा तयार झाला आला पाहिजे. पण आज कसलीच हालचाल दिसत नाही! शेजारी पहिल तर मिसेस सानेही शेजारी नाहीत. काय भानगड आहे बुआ आज? 

चष्मा चढवून मिस्टर साने बेडरूम मधून बाहेर आले. मिसेस सानेंचा घरात कुठेच पत्ता नव्हता! गेली कुठे  ही? मिस्टर सानेंनी सुनबाईंना विचारायच ठरवलं. पण श्वेता त्यांना कुठे दिसेना. इतक्यात, "गुडमॉर्निंग  बाबा!" म्हणत श्वेता जांभई देत बाहेर आली आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता, तडक "गुडमॉर्निंग आई" म्हणत किचन मध्ये गेली. मिस्टर साने तिला काही सांगणार इतक्यात, "अहो बाबा, आई कुठेयत?" म्हणत पुन्हा बाहेर आली. एव्हाना तिची झोप पूर्णपणे उडाली होती. "माहित नाही बुआ, मला वाटलं तुला काही बोलली असेल..." 

त्यांना वाटलं श्वेता त्यांना काही सांगेल कि त्यांची बायको आहे तरी कुठे. काही नाही तर, निदान चहा करेल त्यांच्यासाठी. पण ती असं काहीही न करता "थांबा बाबा, मी संतोष ला उठवते." असं म्हणत नवऱ्याला उठवायला निघून गेली.

चला आता संतोष उठला कि आपल्याला चहा मिळणार अशी मिस्टर सानेंना आशा वाटली. शिवाय, मिसेस साने त्याला काही बोलल्या असतील तर तेही कळेल. गुड. 

मिस्टर सानेंनी दराबाहेरचा पेपर घेतला. पाहतात तर दूधही बाहेरच होत अजून. मिसेस सानेंनी दूधही आत घेतल नाही? त्यांना जरा काळजी वाटायला लागली. ते पेपर घेऊन आत येतच होते तेवढ्यात  त्यांना संतोष दिसला. "हा सकाळी सकाळी कुणाला फोने करतोय?" असा विचार अजून मनात येणार, इतक्यात मिसेस सानेंचा फोन वाजायला लागला. संतोष ने आपला फोने कट केला आणि थोड्या रागानेच म्हणाला,"फोन आजही  न घेताच बाहेर गेली  ही!"  

सडे आठ वाजत  आले होते. श्वेता ने चहा केला. ऑफिस ला आता उशीर होणार हे स्पष्ट दिसत होतं. शेजारी जोशी काकूंना माहित असेल का आई कुठे असतील ते? चहा पीता पीता श्वेता ने आज ऑफिस ला न जाण्याचा विचार मांडला. संतोष ला हि विचार पटला. श्वेता ने बॉस ला सिक लिव्ह साठी एसेमेस पाठवला. संतोष ने त्याच्या मिटींग्स कॅन्सल केल्या. मिस्टर सानेंना काय करावे सुचेना. 

"आई कधी पासून घरात नाहीये कुणाला माहितीये?" संतोष ने विचारलं. श्वेता आणि मिस्टर सानेंनी नाही  अशी मान हलवली. 

"मला आठ वाजता जाग आली, तेव्हा पासून कुठे दिसली नाही रे,"

"बाबा, आपण पोलिसांना कळवूया  का?" श्वेता ने दबकतच विचारल. 

"आगं , लगेच पोलीस काय! गेली असेल कुठे तरी देवळात वगैरे, येईल ना ती..." संतोष ला वाटणारी काळजी  त्याच्या रागातून व्यक्त होत होती. 

"अरे, आई कधी जातात का देवळात सकाळी सकाळी? ते पण एकट्या? एकट्या तर आई कुठेच जात नाहीत! आणि ते ही न सांगता ? हे तुला ऑड नाही वाटत?" श्वेता ने पॉईंट मांडला. 

"अरे, संतोष, उषा मावशी ला फोने कर. बघ तिला काही माहितीये का..." मिस्टर  सानेंनी सूचना केली. 

पण तिला हि काही कल्पना नव्हती. आणि संतोषचा काळजी पूर्ण  आवाज ऐकून तिने लागेचच येण्याचा प्लॅन केला. 

*****

बारा वाजत आले होते. श्वेता किचन मधून चहाचा आणखी एक ट्रे घेऊन आली. सकाळ पासून मिस्टर सानेंचा हा तिसरा चहा. संतोष आणि उषा मावशीचा दुसरा. श्वेताला मात्र अजून सकाळच्याच पहिल्या चहाची ढेकर येत होती. कसे काय इतका चहा पितात बाई हे लोक!  

"मी  काय म्हणते,..." 

"श्वेता, मी पोलिसात जाणार नाहीये. तुला आणखी काही  म्हणायचं असेल तर  म्हण."  संतोष आता संतापला होता. 

"अरे असं  काय करतोस. मी काळजी पोटीच बोलतेय ना... " 

"आता बारी काळजी सुचतेय तुला." उषा मावशी न राहून म्हणाली. 

"उषा..." मिस्टर सानेंनी लगेच त्यांना आवर घालायचा प्रयत्न केला.

"आज मला बोलू द्या भाऊजी. माझ्या बहिणीने काय नाही दिलं तुमच्या संसारासाठी? पण तुम्ही तिला कधीही काही बोलू दिल नाहीत. म्हणून आज हा दिवस पाहतोय आपण!"

"मावशी आग काय बोलतेयस तू?" संतोष भांबावून म्हणाला. 

"मला काय विचारतोय्स? तुझ्या बायकोला विचार. तुझ्या बाबांना विचार. गरीब बिचारी माझी बहीण, तिला राबवून घेतलय दोघांनी. तुला काय माहित, तू वर्ष भर अमेरिकेत होतास. पण इथे तुझ्या आई चे काय हाल केलेत ह्या दोघांनी ते विचार त्यांनाच!"

"उषा!" आता मात्र मिस्टर साने ओरडलेच. 

संतोष ला काही कळेना. त्याने मिस्टर सानेंना उषा मावशी शी आसं बोलताना कधीच पहिल नव्हतं. त्याला अमेरिकेतून येऊन एकाच आठवडा झाला होता. अमेरिकेतून फेसटाईम करताना आई, बाबा, श्वेता यांच्या वागण्यातून कधीच त्याला काही वावगं असल्याचा भास झाला नव्हता. मग हे आता उषा मावशी काय म्हणत होती? आणि बाबा का इतके रागावले होते तिच्यावर?  

"मावशी, मला नीट सांगशील का तुला काय म्हणायचंय ते?" त्याने डायरेक्ट मुद्द्याला हात घालायचा ठरवलं. 

"संतोष, तुझ्या आईच्या आणि माझ्या वयात दहा वर्षाचं अंतर  आहे . पण आम्ही सतत मैत्रिणींसारख्या राहिलो. आम्ही एकमेकां पासून काहीही लपवत नसू. तुझ लग्न माझ्या बहिणीनि खूप आशेनं , खूप आनंदानं केलं . घरात सून येईल, तिला मुलीची माया मिळेल.... धा कट्या बहिणीला मैत्रिणीसारख वागवणाऱ्या तुझ्या आईनी खूप स्वप्न रंगवली होती. सुरुवातीचे काही दिवस छान मजेत गेले ही. पण अजून श्वेता नवीन नवीन असे पर्यंतच  तुला अमेरिकेत जायची संधी मिळाली आणि तू जाण्याचा निर्णयही घेतलास. तुझ्या करियर साठी ते आवश्यकही होतं . तुझा आईने  मनावर दगड ठेवून तुला जाऊ  दिलं . पण तिला आशा होती कि श्वेता आता तिला सोबत आहे. 

पण  तसं  काही झालानाही. श्वेता ची नोकरी आणि माहेरी जायची ओढ, यामध्ये तुझी आई मात्र एकटीच राहिली. 

भाऊजी सकाळ-संध्याकाळ त्यांच्या जेष्ठ नागरिक मित्रांसोबत बागेत नाही तर लायब्ररीत दिवस काढत. श्वेता दिवसभर ऑफिसात. संध्याकाळी तरी थोड्या गप्पा होतील म्हणावं तर भाऊजी टी व्ही समोर आणि श्वेता  फोनवर. माझ्या बहिणीने करायचे तरी काय सांग?

रोजचा ऑफिसचा डबा श्वेता ला करून दिला तिने. पण एकही  दिवस श्वेताने  कधी एक  कप चहा सुद्धा केला नाही तिच्या साठी. सकाळच्या चहा  नाष्ट्या पासून ते ऑफिस च्या डब्या  पर्यंत, संध्याकाळच्या खाण्यापासून ते रात्रीच्या जेवण पर्यंत, सगळं माझ्या बहिणीनेच केल. पण कधी एका शब्दाने बोलली नाही काही. कुळाला बोलणार रे? भाऊजी म्हणत, 'कर तुला झेपेल तेवढ, तुझे हात पाय तरी चालायला नकोत का?" आणि श्वेता तर बोलायला घरी नसायचीच! सुट्टी आली कि माहेरी निघून जायची. आणि घरी असताना फोनवर काही ना काही करत असायची. वेळ होता कुणाकडे माझ्या बहिणीशी बोलायला? 

शेवटी मीच म्हटलं तिला, किती दिवस करशील? करतेस ते दिसत नाही कुणाला. एक दिवस तरी ब्रेक नको का तुला? भाऊजींनी इतकी वर्ष नोकरी केली, त्यांना आता रिटायरमेंट मुळे ब्रेक मिळाला. तुझे मुलगा सून दर  वीकएंड ला ब्रेक घेतात ऑफिसाच्या कामातून. पण तुला ब्रेक कुठय? 
तर  मला म्हणाली, मी ब्रेक घेऊन कस चालेल उषे; माझ्या वाचून एक पानही हलत नाही घरातलं. 
मग मीही चिडले. म्हटल म्हणूनच मी लग्न नाही केलं. हवाय कुणाला असला बिनपगारी तमाशा!"

उषा मावशी बोलता बोलता थांबली. तिचे अश्रू तिला आता आवरेना. संतोष ने तिच्या पाठीवर हात फिरवला. आपल्या लक्षात कस आल नाही घरात इतक सगळं चालू असून, हे त्याला कळेना. आई ला इतका त्रास झाला तरी ती काही बोलली नाही. श्वेता हि मानाने वाईट नाही हे आपल्याला माहित आहे. मग प्रॉब्लेम आला कुठे? आपण प्रदेशात टेकनिकाल प्रॉब्लेम सोडवत असताना घरात इतका मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला! आई, ये गं लवकर परत, आता नाही तुला त्रास देणार परत मी... 

मिस्टर साने बालकनीतून बाहेर पाहत उभे होते. त्यांनी ऐकलं होता सगळं, आणि आपली चूक त्यांच्याही आता लक्षात येत होती. रिटायरमेंट नंतर आपण मिसेस कडे लक्ष दिलच नाही हे त्यांना आता पटलं होतं. आपण वॉकिंग आणि वाचनात गर्क असताना आपल्या मिसेसचहि वय होतंय हे आपल्या लक्षातच आला नाही!

श्वेताच्या मात्र डोळ्यात पाणी तरळत होत. तिला तिच्या आईची आठवण झाली. तिची आई खूप कडक. श्वेता च्या वहिनीला मुठीत ठेवून असे. आपलीही सासू आपल्याशी अशीच वागणार या कल्पनेने श्वेता ने लग्न झाल्या पासून सासूला जरा दूर दूरच ठेवलं होत. पण आपली सासू हि आपली आई नाही. ती खूप प्रेमळ आणि सरळ मनाची आहे हे आता तिला कळून चुकल होतं. उगाच आपल्यामुळे त्या माउली ला त्रास झाला असं आता तिला जाणवलं. श्वेता ची कधीच खाष्ट सून होण्याची इच्छा नव्हती, पण आता उषा मावशीनं तिलाच वाईट ठरवलं होतं. फक्त एकदा आईंना परत येऊ दे देवा, मी चूक सुधारेन  माझी ! तिनं मागणं मागितलं.*****


घड्याळात चार चे ठोके पडले. घरात कुणीही जेवलं नव्हतं. चहा मात्र सगळ्यांचा पाच सहा वेळा झाला होता. श्वेता चं पित्ताने डोकं उठलं होतं. संतोष ने आता शेवटी पोलिसात जायचं ठरवलं. बाबांना कदाचित पटणार नाही, पण हे करायलाच हव होत. तो तयार व्हायला उठला आणि दाराची बेल वाजली. धावत जाऊन त्याने दार उघडल तर समोर आई उभी! त्याने आईला घट्ट मिठी मारली.

"ईश्श , काय रे हे!" आई ने लगेच पदर तोंडाला लावला.

"सॉरी आई! प्लीझ मला माफ कर!" संतोष म्हणाला.

"अरे मीच सॉरी म्हणायला हवं खरंतर . सकाळी गडबडीतच गेले; आणि मग दिवसभर काळवायलाच झालं नाही! मेला तो फोनही घरीच विसरले ना ! आणि तुमच्या कुणाचे नंबर नाही बाई पाठ मला..." 

"अगं पण होतीस कुठे तू?"  मिस्टर सानेंनी काळजीने विचारलं.

"अहो ती फर्स्टफ्लोर ची मंजू  नई का?तिला आज मुलगा झाला!"

"त्याचा इथे काय संबंध?" मिस्टर सानेंचा मूड आता बदलता दिसत होता.

"ईश्श ,खरंय बाई, विसरलेच मी! अहो आज सकाळी सकाळी मंजू ने मला  फोन केला. तिच्या अचानक पोटात दुखायला लागल हो! तिची आई यायची आहे पुढच्या आठवड्यात, अजून आठवाच महिना चालू आहे; पण अचानक पोटात कळा यायला लागल्या तिला आणि नरेश पण कामा निमित्त बाहेरगावी गेलाय हो...नरेश म्हणजे तिचा नवरा...हा, तर कुठे होते मी?..."

"कळा " श्वेता, मिस्टर साने, संतोष आणि उषा मावशी सगळ्यांनी एकत्रच उत्तर दिल. 

"हां ! तर तिला हॉस्पिटल ला न्यायला सोबत कुणी नव्हत, मग मी गेले. मला वाटलं, ह्या काही खऱ्या प्रसूतीच्या कळा  नसतील, येईन तासा भारात परत, कशाला तुमची सकाळची झोप मोड करा? म्हणून गेले. तर, गम्मतच झाली! डॉक्टर म्हणाले इमरगन्सी सिझरिन करायचंय! मग काय, मला कसले कसले फॉर्म सही करायला लावले त्यांनी, आणि बघता बघता मंजू आली कि हो ऑपरेशन थेटर मधून बाहेर! कित्ती गोंडस आहे तिचं  बाळ, तुम्हाला काय सांगू!..." 

मिसेस साने अजूनही त्या बाळाच्या आठवणीत रमल्या होत्या. समोर मिस्टर साने, संतोष , उषा मावशी आणि श्वेता यांचे आश्चर्यचकित चेहरे दिसायला त्यांना थोडा वेळ लागला. पण अखेर त्यांना जाणवलच कि काही तरी गडबड आहे.

"इश्श अहो विसरलेच मी! श्वेता तू ह्या वेळी घरी कशी? ऑफिस ला नाही गेलीस? आणि उषे, तू काय करतेयस इथे? आणि अहो संतोष कसा घरी ह्या वेळी?"

"आई, तुम्ही बसा. चहा घ्या बघू आधी. मी आत्ताच केलाय गरम. आज अहो, आम्ही दोघांनी सहजच रजा घ्यायचं ठरवलं. म्हटलं तुमच्याशी गप्पा मारू...काय?" श्वेता ने मिसेस सानेंच्या हातात चहा चा कप देत म्हटलं.

"अ.. हो ना..मी पण आज लायब्ररीत नाही गेलो. उद्या तू पण चल माझ्या बरोबर...तुला हि मेम्बरशिप घेऊन देतो. मग पुस्तकं वाच तुझ्या फावल्या वेळात. तुला हि एक...ब्रेक..." मिस्टर साने म्हणाले. 

उषा मावशी नुसत्याच हसल्या. कुणी पाहत नाही हे बघून हळूच त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं, आणि म्हणाल्या, "मी आले होते तुला भेटायला, सहजच. चल, चहा पी आता लवकर गार होण्या आधी तो. रात्री जेवायला थांबतेय  मी, भरलं वांग करूया मस्त! काय?' 


*****
  

Comments

Popular Posts